सारथी युथ फाउंडेशन ही संस्था नावाप्रमाणेच युवक युवतींसाठी त्यांच्या कौशल्य विकासासाठी सतत कार्यरत असते. त्याचप्रमाणे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट हे तंबाखू व्यसनमुक्ती असे आहे. यावर्षीही सारथी युथ फाउंडेशनने युवकांमधील कौशल्यांचा विकास सादर व्यसनमुक्त जीवनाची वाटचाल करण्यासाठी 31 मे जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनाच्या निमित्ताने दि. 20 मे ते 31 मे 2026 या काळामध्ये विडी घरकुल कामगार वसाहतमधिल सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रमध्ये कामगार कुटुंबातील युवक- युवतींसाठी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात सुमारे 30 युवक युवतीनी आपली उपस्थिती लावली होती.
दिनांक 20 मे रोजी सकाळी 11 वा. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सचिव श्री. रामचंद्र वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले आणि साध्या कागदापासून काय काय बनवता येईल यासाठीचे खेळ घेण्यात आले.
21 मे रोजी सोलापूर शहरातली नामांकित संस्था “प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर” यांनी उपस्थित शिबिरार्थींची हिमोग्लोबिन तपासणी केली आणि किशोर अवस्था आणि तारुण्यात आरोग्य कसे राखावे? याबद्दल मार्गदर्शन केले.
दि. 22 मे रोजी सारथी संस्थेचे सचिव श्री. रामचंद्र वाघमारे यांनी तंबाखू व्यसनमुक्ती जनजागृती कार्यशाळा घेतली. 23 मे रोजी सेवादायी संस्थेचे श्री विष्णू भोसले यांनी शिबीरार्थीशी विविध विषयांवर मुक्त संवाद साधला. 24 मे रोजी “कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावर श्री. योगेश हासरभावे यांनी मार्गदर्शन केले. 25 मे रोजी “प पाळीचा” या विषयावर श्री. राहुल बिराजदार यांनी मार्गदर्शन केले.
26 मे रोजी तंबाखू व्यसन आणि मोबाईलचे व्यसन फायदे- नुकसान या विषयावर वादविवाद स्पर्धा घेण्यात घेण्यात आली. त्यात श्री योगेश हासरभावे यांनी मार्गदर्शन केले. 27 मे रोजी श्री.सुजित साठे यांनी प्रेरणादायी जीवन प्रवासाचे कथन केले. 28 मे रोजी” स्पर्धा परीक्षांना सामोरे कसे जावे?” या विषयावर स्वतः एमपीएससी ची तयारी करणाऱ्या साक्षी सर्वगोड यांनी मार्गदर्शन केले.
29 मे रोजी विणकाम आणि मणी काम कसे करावे? याचे प्रात्यक्षिक प्राजक्ता अतनूरकर यांनी सादर तरुण मार्गदर्शन केले. 30 मे रोजी “बँकिंग” आणि “जीवनशैली” या दोन विषयावर श्री प्रसाद अतनूरकर यांनी मार्गदर्शन केले. तर आपली जीवन कहाणी श्री. रामचंद्र वाघमारे यांनी कथन केली. तेव्हा वातावरण अतिशय भाऊक झाले होते. 31 मे रोजी सर्वांनी विविध खेळाचा आनंद घेतला. शिबिराथींनी स्वहस्ते भेळ व पुलाव करून त्याचा आस्वाद घेतला आणि संस्थेच्याच एका भिंतीवर स्वतःच्या हाताचे ठसे एका वठलेल्या झाडाच्या चित्रावर लाऊन आपल्या आठवणींना संस्थेत चिरंतन केले.
शिबिरामुळे आम्हाला खूप फायदा झाला असे मत अनेक शिबिरार्थींनी समारोपाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. अशा रीतीने दहा दिवसाचे हे शिबिर उत्तमरीत्या संपन्न झाले. सदर शिबिर संपन्न करण्यासाठी संस्थेचे श्री योगेश हसरभावे आणि कांचन सुरवसे यांनी परिश्रम घेतले तर त्यांना संस्था सचिव श्री. रामचंद्र वाघमारे यांनी मार्गदर्शन केले होते.






